मुंबई (कोकणवृत्त विशेष) : शुक्रवार मध्यरात्रीपासून मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. तर मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र आता मुंबईला अतिवृष्टीचा धोका नसून पुढील २४ तासांत रायगड व दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे के.एस. होसाळीकर यांनी दिली.
पावसाने दमदार हजेरी लावत मुंबईकरांची झोप उडवली होती. तर ९ ते ११ जून मुंबईत अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई हवामान खात्याने दिला होता. मात्र मुंबईवर वरुणराजाची होणारी अवकुपा टळली असून पुढील दोन दिवस रायगड व दक्षिण कोकणासाठी धोकादायक ठरू शकतात. या भागात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरचे संकट आता रायगड व कोकणात गेले आहे. पुढील दोन दिवस रायगड व कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची होसाळीकर यांनी दिली.