
सिनेविस्टा स्टुडिओ
मुंबई- साकीनाका आणि कमला मिल हादरवून टाकणाऱ्या आग दुर्घटनेनंतरही मुंबईत नव्या वर्षाच्या प्रारंभीपासूनच आगी लागण्याचे सत्र कायम आहे. मागील २४ तासात विविध ठिकाणी तीन आगी लागण्याच्या घटनांची नोंद झाली. घाटकोपर, लोअरपरळ आणि कांजूरमार्ग येथील सिनेविस्टा स्टुडिओला आग लागली. यात एका तंत्रज्ञाचा मृत्यू झाला आहे.
कमला मिल आग दुर्घटनेनंतर पालिकेने हॉटेल, आस्थापनामधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा तपासण्याचे आदेश दिले. मात्र तरीही याकडे दुर्लक्ष केल्याने मुंबईत आगीच्या घटना वाढू लागल्या आहेत. मागील २४ तासांत घाटकोपर पूर्व येथील पंतनगर देरासार लेन मधील कैलास ज्योत या ९ मजली इमारतीत सातव्या मजल्यावरील प्लॅटमध्ये आग लागून मोठया प्रमाणात विद्युत उपकरणे, लाकडी साहित्य, फर्निचर जळून खाक झाले. त्यानंतर लोअरपरळमधील शिवशक्ती इंडस्ट्रीमध्ये संध्याकाळी साडेसहा च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग विझवली. सुदैवाने या दोन्ही घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दोन्ही आगीच्या घटना ताज्या असताना कांजुरमार्ग येथील सिनेविस्टा या स्टुडिओला मध्यरात्री भीषण आग लागून त्यात एकाचा होरपळून मृत्यू झाला.
स्टुडिओतील तंत्रज्ञाचा मृत्यू
शनिवारी मध्यरात्री सिनेविस्टा स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीत ऑडिओत काम करणारा तंत्रज्ञ गोपी सुरेश वर्मा (२०) मृत्यू झाला. मध्यरात्री २ च्या सुमारास तंत्रज्ञाचा मृतदेह सापडला. वर्मा हे आग लागली तेव्हा स्टुडिओत असल्याने त्यांना बाहेर पडता आले. त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. स्टुडिओमधील जनरेटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात जात आहे. मात्र याबाबचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.