मुंबई, ता. 22 : पट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढण्याचा धोका असून, केंद्र सरकारने मुंबईसह देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमंती कमी कराव्यात, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.
खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आजमितीला मुंबईत पेट्रोलचे दर 102 रुपये/लिटर तर डिझेलचे दर 94 रुपये/ लिटर हुन अधिक झाले आहेत. येत्या काही दिवसांत हे दर 150 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. देशातील 23 रिफायनरी पैकी दोन रिफायनरी या माझ्या लोकसभा मतदारसंघात आहेत. याठिकाणी क्रूड ऑइल वर प्रक्रिया करून पेट्रोल आणि डिझेलचे वितरण संपूर्ण राज्यात केले जाते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने याठिकाणी पेट्रोल आणि डिझेलला मोठी मागणी आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार पेट्रोल आणि डिझेलवरी एक्साईज ड्युटीमध्ये 2014 पासून आत्तापर्यंत 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र आणि गुजरात सरकारने इंधनावरील वॅट कमी केल्याने आणखी आर्थिक बोजा राज्यांवर पडला आहे. या परिस्थितीत, ज्या शहरांमध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट चे उत्पादन केले जाते, त्या शहरांमध्ये तरी इंधनाचे दर कमी असायला हवेत.
इंधनाचे दर कमी ठेवणे हे सरकारचे सामाजिक दायित्व आणि जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत मुंबईसह देशभरात इंधनाचे दर कमी करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात केली आहे.















