
मराठा बांधव आझाद मैदानावर, मग उद्धव ठाकरे व संजय राऊत भेटायला का गेले नाहीत?
मुंबई, 31. ऑगस्ट : “तुम्हाला लालबागचा राजा आवडत नाही, पण औरंगजेबाच्या कबरीला गेले असते तर तुम्ही स्वागत केले असते का? देशाचे गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले म्हणून तुम्हाला मिर्चा झोंबल्या. संजय राऊत, हा नालायकपणा करू नका. मुंबईकर भाजप, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या पाठीशी आहेत आणि लालबागचा राजा देखील मुंबईकरांसोबत भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देणार आहे”, असा विश्वास व्यक्त करत शिवसेना उबाठा गट खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर भाजप प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिले.
काल अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले, या दौऱ्यावर राऊत यांनी टीका केली होती.
बन म्हणाले की, “संजय राऊत यांचा नागरिकशास्त्राचा अभ्यास कच्चा आहे का? नागरिकशास्त्राच्या परीक्षेत त्यांना शून्य मार्क मिळाले होते का? कारण मुंबईचा महापौर हा बाहेरचा नसून मुंबईचाच नागरिक होतो. मुंबईत मतदानाचा अधिकार ज्याला आहे, त्यालाच महापौर होण्याचा अधिकार आहे. हा मूलभूत अधिकार राऊत विसरले आहेत का?”
बन म्हणाले, “मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होणार आणि तो महायुतीचाच होणार हे कळल्यामुळेच संजय राऊत यांनी निवडणूकीपूर्वी पराभव मान्य केला आहे. त्यांनी शस्त्र टाकली आहेत कारण सर्वसामान्य मुंबईकर हा भाजप आणि महायुतीसोबत उभा आहे. त्यामुळेच राऊतांची तंतरली आहे.”
ते पुढे म्हणाले, “काल केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह काय बोलले, याचे उत्तर मुंबईकर निवडणुकीत देतील. मात्र हे स्पष्ट आहे की यापुढे मुंबईत उबाठा गटाचा महापौर होणार नाही. विधानसभेत लोकांनी जसे त्यांना घरचा रस्ता दाखवला, तसेच महापालिकेतही दाखवतील.”
मराठा समाजाचे बांधव दोन दिवसांपासून आझाद मैदानावर बसलेले आहेत, पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांना भेट देण्याची तसदी घेतली नाही. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना थेट सवाल केला आहे.
“मराठा समाज ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत आहे. या संवेदनशील विषयावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी. फक्त भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर प्रश्न विचारून चालणार नाही. आधी मराठा आरक्षणाबाबतचे धोरण जाहीर करा,” असे आव्हान नवनाथ बन यांनी ठाकरे गटाला दिले.
बन म्हणाले, “संजय राऊत दररोज भाजपवर टीका करतात, पण मराठा समाजाला काय उत्तर द्यायचे, यावर मात्र गप्प आहेत. अमित शाहांना प्रश्न विचारण्याआधी ठाकरे गटाने ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका घ्यावी.”
त्याचबरोबर त्यांनी टोला लगावला की, “मराठा समाजासाठी आझाद मैदान गाठण्याची हिंमत होत नाही, कारण मराठा समाजाचं आरक्षण उद्ध्व ठाकरे मुख्यमंत्री असताना गेलं होतं. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आल्यावर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्याची आठवण त्या करून दिली.















