मुंबई : राज्यातील दुर्गम भागात तसेच शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आता फिरत्या दवाखान्यांमधून आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. ‘फिरते वैद्यकीय उपचार केंद्र’ (Mobile Medical Unit) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा १० फिरत्या वैद्यकीय वाहनांचे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यापैकी ५ फिरती वैद्यकीय वाहने मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये सेवा देतील. या फिरत्या वैद्यकीय वाहनांतील सर्व सेवा मोफत असतील.वांद्रे येथील रंगशारदा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून या फिरत्या वैद्यकीय वाहनांचे लोकार्पण केले. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या आरोग्य विकासासाठी मागील चार वर्षात करण्यात आलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की, राज्यात मागील काही वर्षात आरोग्य सेवेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. टेलिमेडीसीनसारख्या सुविधा दुर्गम तसेच आदिवासी भागातील नागरीकांना वरदान ठरणार आहेत. राज्य शासनाने सुरु केलेल्या मोटारबाईक अॅम्बुलन्स, बोट अॅम्बुलन्ससारख्या उपक्रमांमुळे नागरीकांना जलदगतीने आरोग्य सुविधा मिळत आहेत. मुंबईत अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचणे कठिण असते. अशा ठिकाणी या मोटारबाईक अॅम्बुलन्स सेवा देत आहेत. आज सुरु करण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्यांचाही राज्यातील झोपडपट्ट्यांमध्ये तसेच आदिवासी, दुर्गम भागात राहणाऱ्या गोरगरीब नागरीकांना मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.