कोकणवृत्तसेवा विशेष
देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईवर शिवसेनेची पकड ढीली झाल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आज सकाळपासूनच मुंबई महापालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास शिवसेना ९० जागांच्या वर आघाडीवर होती. त्यामुळे हा पक्ष बाजी मारणार, अशी चर्चा सुरू झाली होती. दुपारी जेव्हा संपूर्ण चित्र स्पष्ट झाले तेव्हा शिवसेना-८४ आणि भाजपा-८२ अशा जागा मिळाल्याचे जाहीर झाले. यानंतरच खरा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांना मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलेले नाही. आता हे पक्ष कोणाच्या साथीने मुंबईवर सत्ता स्थापन करतात, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
दोन्ही पक्षांनी पालिका निवडणुकीत एकमेकांवर अतिशय हीन दर्जाचे आरोप केले आणि हे आरोप करतच जागा मिळवल्या. सध्याच्या आकडेवारीनुसार शिवसेनेकडे भाजपापेक्षा दोन जागा जास्त आहेत. आता हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत कोणता निकष लावला जाणार, हे अद्यापतरी स्पष्ट झालेले नाही. मतदारांनी दोन्ही पक्षांना चांगलाच धडा शिकवला आहे. ते एकत्र आल्यास एकमेकांवर केलेल्या आरोपांचे काय? हा प्रश्न उपस्थित केला जाईल.
ऐन मतदानाच्या काही दिवस आधी सेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा खिशात घेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे नाटक केले. हे नाटक मतदारांना रुचले नाही. त्याचाही फटका सेनेला बसलेला आहे. हे सरकार नोटीस पिरियडवर आहे, असे उद्धव म्हणाले होते. पण, नोटीशीचा काळ कुठपर्यंत आहे,हे सांगण्यास ते विसरले. याचाही परिणाम मतदानावर झाला.
भाजपानेही शिवसेनेवर इतके आरोप केले की, हे शिवसेनेला सत्तेत घेऊन का बसले आहेत? असा प्रश्नही या मतदानातून मतदारांनी भाजपाला विचारला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा सत्तेचे राजकारण करतात की मतदारांच्या विश्वासघातांचे हे येत्या काही दिवसातच कळेल.