रत्नागिरी :उत्तर रत्नागिरीतील खेड तालुक्याला मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. पावसामुळे खेड शहरात सध्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक 4 वाजल्यापासून ठप्प झाली आहे.खेड शहरात पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतलेली नाही. त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नारंगी नदीला पूर आल्याने दापोली खेड मार्गावरची वाहतूक संथ गतीने सुरु होती. तर खेड शहराजवळील देवणे बंदर पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पाऊस थांबण्याचं काही नाव घेत नाहीय, त्यामुळे तालुक्यातील अंतर्गत भागात वाहतूक विस्कळित झाली असून नारंगीच्या पातळीत वाढ झाल्याने शेतीत पाणी घुसले आहे. तर खेडमधील सुसेरी बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. जगबुडी नदीवरील कोल्हापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे.दरम्यान जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सव्वाचार वाजता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. पाणी पातळी कमी झाल्यास या पुलावरून वाहतूक सुरु करण्यात येणार आहे, मात्र 2 तास झाले तरी वाहतूक सुरु झालेली नव्हती.
खेडमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरीकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.