मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या जे.पी. नाईक भवनमध्ये प्रा. नारायण भोसले लिखित देशोधडी : आडं, मेडी, बारा खुट्याची या पुस्तकाचा परिसंवाद संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र या कार्यक्रमाचे निमंत्रक होते. विद्यापीठ प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, अधिष्ठाता प्रा. राजेश खरात, केंद्राच्या प्रभारी संचालिका प्रा. मनीषा करणे, विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. अनिल सपकाळ , संशोधक-लेखिका- सामाजिक कार्यकर्ती डॉ. लता प्रतिभा मधुकर, प्रा. नारायण भोसले यावेळी उपस्थित होते. नागपंथी डवरी गोसावी समाजाचे चित्रण या पुस्तकात आहे.
‘धार्मिक गुलामगिरी, दुय्यमत्व, सामाजिक दृष्टिकोन, भुकेचा संदर्भ या पुस्तकात मांडण्यात आले आहे. जीवनाचा संघर्ष ते उजळलेला प्रवास जो प्रकाशाच्या दिशेने चाललेला आहे तसेच राजकीय दृष्टिकोन या आत्मकथनात आहे. अनुभव जगण्याची धडपड या कथनात आहे. भुकेसाठी माणसांना किती झटाव लागते, ते आहे. यातील कथनाची पद्धत विविध व्यक्तिमत्व आहेत. बोलभाषा आहे. अभिव्यक्ती आहे. हे बहुमुखी कथन आहे. व्यक्तिरेखांचे कंगोरे पहायला मिळतात. जातभाषेची वैशिष्ट्ये आहेत. भटक्यांचा प्रश्न किती महत्वाचा आहे. तो केंद्रवर्ती होऊ शकतो की नाही, ते आहे. यासाठी नवीन समाजरचना निर्माण करता येण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत,’ असे मत यावेळी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. अनिल सपकाळ यांनी व्यक्त केलं.
संशोधक, लेखिका, सामाजिक कार्यकर्ती डॉ. लता प्रतिभा मधुकर म्हणाल्या की, ‘आताचा काळ म्हणजेच 2014 पासूनचा जो काळ आहे त्यात भांडवलीकरण होत आहे. हे भांडवलीकरणाला आव्हान देणारे पुस्तक आहे. कष्टकरी मुलांच्या जगण्याबाबत सत्ताधारी वर्गाला काहीच माहीत नसते. देशोधडी म्हणजे ज्या देशात जन्मलो त्या देशात माझ्यासाठी कोणतीही भूमी नाही. दोन विभिन्न व्यवस्था समाजात अस्तित्वात आहे. एकाला मान आहे तर दुसऱ्याच्या वाटेला अपमान आहे. मंडल आयोगाला पुरवणी देणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. सामाजिक विसंगती यात आहे. माणसाचे असे जगणे की रोजच विस्थापन, रोजच पलायन या कथनात आहे. या पुस्तकाची भाषा संपन्न आहे. जगण्याला भिडण्याचा इतिहास आहे. जात पंचायतीत स्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जातात, यावर भाष्य आहे. पुरुष जिथे नाही तिथे कणखरपणे उभी असलेल्या बाईचे चित्रण आहे. हे पुस्तक प्रथम व्यक्ती निवेदन आहे.’
‘नागपंथी डवरी गोसावी समाजाचा इतिहास या पुस्तकात आहे. भिक्षा मागून हा समाज जगतो. मोब लिंचिंगला हा समाज बळी पडतो,’ अशी खंत प्रा. नारायण भोसले यांनी व्यक्त केली.
‘भटक्या विमुक्त समाजावर संशोधन झाले पाहिजे. अजूनही समाजातील एका अंगाला दाहक प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. या पुस्तकात मांडण्यात आलेला सकारात्मक दृष्टीकोन घेण्यासारखा आहे,’ असे मत रविंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप जानकर यांनी केले.















