मुंबई : मराठी माणसाच्या हितासाठी कोणाचेही पाय चाटण्यास तयार आहे, परंतु, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कोणाचा डाव असेल तर पाय छाटेन, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. बुधवारी शिवाजी मंदिरात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपावर टीका केली. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रथमच त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मुंबई वेगळी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा प्रयत्न आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.
भाजपा नको म्हणून मी शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला, परंतु त्यांनी तो झिडकारला. युती व्हावी, यासाठी सात वेळा फोन केला. एकदाही तो उचलला गेला नाही. यापुढे शिवसेनेशी युतीबाबतचा विषय संपला, असे राज यांनी जाहीर केले. शिवसेना आणि भाजपा हे आपआपसात मिळालेले आहेत, असा आरोपदेखील त्यांनी केला. कल्याण-डोंबिवलीत एकमेकांविरोधात लढले आणि सत्तेसाठी एकत्र आले, याकडे राज यांनी लक्ष वेधले.
आर्थिक कारणे असल्यानेच शिवसेनेसमोर पुढे केलेला मैत्रीचा हात झिडकारला गेला. शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडायचे नाही, असे म्हणत त्यांनी सेनेवर टीकेची झोड उठविली. नोटाबंदीवरून त्यांनी भाजपालादेखील फटकारले. नोटाबंदीनंतर देश बदलेल, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. यावर दररोज घराच्या खिडकीतून बाहेर पाहतो, काही बदल दिसत नाही, तेच शिवाजी पार्क, तीच माणसे दिसतात, असे म्हणत राज यांनी नोटाबंदीची खिल्ली उडविली. नोटाबंदीनंतर मोदींनी दररोज नवे निर्णय घेतले. यावर काहीच बोलले जात नाही, असेही राज म्हणाले.
२५ वर्षांत सेना-भाजपाला जे मुंबईत जे जमले नाही, ते ५ वर्षांमध्ये नाशिकमध्ये करून दाखविले. नाशिकमध्ये रस्त्यावर खड्डे नाहीत. या महापालिकेवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असे राज यांनी सांगितले.
थापा या पर्यायी शब्दाला भाजपा हा शब्द आहे. तर गुगलवर फेकू असा शब्द टाकला की मोदी असे नाव येते. त्यामुळे जगात मोदींची प्रतिमा काय आहे? असे म्हणत राज यांनी मोदींवर तीव्र टीका केली.