मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आवारात उभ्या असलेल्या ६१ इमारतींपैकी सुमारे ३६ इमारतींना पालिकेने ओसी दिली नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे आधीच परीक्षा निकाल गोंधळामुळे वादग्रस्त ठरलेल्या विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेकडे मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतीस दिलेल्या सीसी, आयओडी, ओसीची माहिती मागितली होती. दरम्यान, उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) विशेष विभागाने दिलेल्या माहितीनुसार सांताकूझ पूर्व, कोले-कल्याण व्हिलेज, सीटीएस नंबर ४०९४ येथील जमिनीवर मुंबई विद्यापीठाने बांधलेल्या अधिकांश इमारतींना पालिकेने ओसी दिली नाही. येथील ६१ इमारतीपैकी फक्त २४ इमारतींना ओसी मिळाली असून उर्वरित ३६ इमारती अद्याप ओसीविना आहेत. आयसीएसएसआर, हॉस्टेल, रीडरर्स क्वार्ट्स १२ ए, १२बी, १२ सी, विद्यार्थी कॅन्टीन, ओल्ड लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, जेएन लायब्ररी, जेपी नाईक भवन, डब्ल्यूआरआयसी प्रशासकीय इमारत, आरोग्य केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील बॉयज हॉस्टेल, एमडीके लेडीज हॉस्टेल, गरवारे इन्स्टिट्यूट ओल्ड, न्यू गरवारे इन्स्टिट्यूट, वर्क शॉप गरवारे, स्टाफ क्वार्ट्स जी, पंडिता रमाबाई लेडीज हॉस्टेल, अलकेश दिनेश मोदी गॅलरी, मराठी भवन, आयडॉल इमारत, झंडू इन्स्टिट्यूट, अनेक्स बिल्डिंग, लाईफ सायन्स बिल्डिंग, एक्साम कॅन्टीन, शिक्षक भवन, पोस्ट ऑफिस, सर्व्हट क्वार्ट्स, न्यू लेक्चर कॉम्प्लेक्स, संस्कृत भवन, भाषा भवन, राजीव गांधी सेंटर, आयटी पार्क, शंकरराव चव्हाण टीचर्स टेर्निंग अकादमी, यूएमडीएइ हॉस्टेल, यूएमडीएइ फॉकलिटी बिल्डिंग, नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्निकल सेंटर या इमारतीचा यात समावेश आहे.
ओसी नसलेल्या मुंबई विद्यापीठ आणि वास्तुविशारद यांची चूक आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर कडक कारवाई व ओसी नसलेल्या इमारतीचा सुधारित आराखडा नव्याने तयार करावा, अशी मागणी गलगली यांनी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठवून केली आहे.