ठाणे, 8 जुलै : आरपीएफ हेड कॉन्स्टेबल के.एन. शेलार आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी शिवाजी पवार हे आरपीएफ अंतर्गत कार्यरत असताना दि. ७.७.२०२० रोजी दिल्ली ते एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस विशेष गाडीतून एसीपी (अलार्म चेन पुलिंग) चा अवलंब करून निळजे आणि तळोजा (नवी मुंबई) दरम्यान किमी क्रमांक ५६/१७ येथे उतरताना एका नायजेरियन नागरिकाला पकडले.
त्याला दिवा येथील आरपीएफ ठाण्यात आणले गेले आणि चौकशी केली असता त्याने आपले नाव सनी ओचा आयके वय ४१ राहणार नायजेरिया असून पासपोर्ट क्रमांक ए10059012 असल्याचे सांगितले. तो नवी दिल्ली ते पनवेल, तृतीय वातानुकूलित डब्ब्यातून पीएनआर क्र. 2310186539 तिकिटासह प्रवास करत होता.
त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यांना एक संशयास्पद पदार्थ आढळून आला. पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, मध्य रेल्वे, मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी नारकोटिक कंट्रोल ब्यूरो (एनसीबी), मुंबई यांच्याशी समन्वय साधला आणि त्यांची मदत घेतली गेली. तपास पथक, तज्ज्ञांसह आरपीएफ ठाणे दिवा येथे आले आणि पदार्थाची तपासणी केली असता २.३ किलो वजनाचे “अॅम्फॅटामाइन्स’ नावाचे एक मादक द्रव्य असल्याचे आढळून आले. जप्त केलेल्या मादक द्रव्याचे मूल्य अंदाजे रू. २ कोटी आहे. एनडीपीएस (नारकोटिक ड्रग्स अंड सायकोट्रोपिक सबस्टन्ससेस) कायद्यांतर्गत प्रक्रिया अवलंबण्यात येऊन आरोपी आणि जप्त केलेला मादक द्रव्य पदार्थ एनसीबी अधिका-यांकडे सुपूर्द करण्यात आला. आरपीएफच्या जवानांनी केलेल्या या चांगल्या कार्याचे वरिष्ठ अधिका-यांनी कौतुक केले.