Mumbai : “आरोग्य व वैद्यकीय विषयक सेवांबाबत सातत्याने संशोधन होत असते. तसेच या संबंधिच्या तंत्रज्ञानात देखील नियमितपणे प्रगती होत असते. यामुळेच आरोग्य व वैद्यकीय विषयक सेवा देणा-या व्यक्तिंना अधिकाधिक परिणामकारक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आणि दवाखान्यांमध्ये अविरतपणे रुग्णसेवा करणा-या परिचारीकांना ‘ईको इंडिया’ या संस्थेद्वारे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. ‘संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण’ (Infection Prevention & Control) याबाबत देण्यात येत असलेल्या अधिक शास्त्रशुद्ध व अद्ययावत प्रशिक्षणाचा लाभ अधिकाधिक परिचारीकांनी घ्यावा. तसेच या प्रशिक्षणातून मिळणा-या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग हा आपल्या दैनंदिन रुग्णसेवेत करावा”, असे मार्गदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी केले. ते आज सार्वजनिक आरोग्य खाते व ईको इंडिया यांच्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या कार्यक्रमाला उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कु-हाडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे, ईको इंडिया या संस्थेचे डॉक्टर (कर्नल) श्री. कुमुद रई यांच्यासह संबंधीत विषयातील तज्ज्ञ मंडळी आणि परिचारीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दर आठवड्याला एक दिवस याप्रमाणे सलग १३ आठवडे हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात २७९ परिचारीका सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे सुलभ व्हावे, याकरीता त्यांना ईको इंडिया या संस्थेद्वारे टॅबलेट्स देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य खात्याच्या ८ कार्यालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सींगसाठी आवश्यक ती यंत्रसामुगी देखील सदर संस्थेद्वारे मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयन करणा-या ईको इंडिया या संस्थेचे डॉक्टर (कर्नल) श्री. कुमुद रई यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृहे, आरोग्य केंद्रे तसेच जंबो कोविड केंद्रे इत्यादी ठिकाणी कार्यरत असणा-या परिचारीकांना ‘संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण’ या विषयावर दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने प्रशिक्षण दिले जाणार असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यात २७९ परिचारीकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण’ हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक आरोग्य कर्मचा-याचे या बाबतचे ज्ञान सतत अद्यावत करणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन असून १३ मॉड्युल्सचे असणार आहे. यातील १० मॉड्युल्स हे संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण याबद्दल असून ३ मॉड्युल्स कार्यक्षमता कौश्यल्य याबाबत असणार आहेत, अशीही माहिती या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.