
मुंबई :भ्रष्टाचाराने संपूर्णपणे ग्रासलेली आणि वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचाराने संपूर्णपणे पोखरलेली मुंबई महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.पत्राद्वारे संजय निरुपम यांनी ही मागणी केली. वडाळा येथील लॉइड इस्टेट या इमारतीच्या कंपाउंडचा भाग सोमवारी जमिनीत खचला गेला. त्याबरोबर बिल्डिंग परिसरातील बरीच वाहने त्या खड्यात खचली गेली. दोस्ती रियल्टी च्या अवैधरित्या सुरु असलेल्या बिल्डिंगच्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडली आहे. अजून ही तेथील जमीन खचण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पण मुंबई महापालिकेकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून अजूनही त्या बिल्डरवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. सरकारने मुंबईला वाऱ्यावर सोडल्यासारखेच दिसत आहे. त्या बिल्डरला गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी महापालिका अधिकारी आणि सत्ताधारी पक्ष त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याच साठी आम्ही बुधवारी लॉइड इस्टेट, दोस्ती ब्लॉसम आणि कारनेशन या इमारतींमधील रहिवाशांसोबत महापालिकेच्या इमारत बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. दोन इमारतींच्या मध्ये पुरेशी जागा नसताना महापालिका अधिकाऱ्यांनी दोस्ती रियल्टीला येथे ट्वीन टॉवरचे बांधकाम सुरु करण्याची परवानगी का दिली. इमारत बांधकाम विभाग, मुंबई महापालिका आणि बिल्डर लॉबी यांचे एकमेकांशी संगनमत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. इमारत बांधकाम विभागातील अधिकारी आणि महापालिका अधिकारी यांना दोस्ती बिल्डरने चांगले कमिशन दिल्याचे यावरून दिसत आहे. इमारत बांधकाम विभाग हा थेट महापालिका आयुक्तांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांचाही यामध्ये वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे आणि या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच सर्व नियम धाब्यावर बसवून दोस्ती बिल्डरचे काम सुरु आहे. आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, त्यांनी लॉइड इस्टेट आणि त्याच्या परिसरातील नागरिकांना मृत्यूच्या दाढेत मरण्यासाठी सोडून देण्याऐवजी या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर त्वरित कारवाई करावी. मुंबई महापालिका बरखास्त करावी, महापालिकेमध्ये सुरु असलेला भ्रष्टाचार साफ करण्यासाठी एका व्यवस्थापकाची नेमणूक करावी. मनपा आयुक्त अजोय मेहता यांचे ताबडतोब निलंबन करण्यात यावे. त्यांची उच्च स्तरावर चौकशी करण्यात यावी, महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सहा महिन्यांच्या आत चौकशी करण्यासाठी एका विशेष न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात यावी आणि या संपूर्ण गैरकारभाराची, भ्रष्टाचाराची व घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.