मुंबई, विशेष प्रतिनिधीः- मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे पर्यटकांच्या कारला अपघात होवून एकजण ठार झाला तर दोघे किरकोळ जखमी झाले. मंगळवारी पहाटे ४.३० वा. च्या सुमारास ही घटना घडली. सुकुमार देवाप्पा चौगुले (३०) रा.कोल्हापूर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
भरधाव वेगातील तवेरा कारवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या ‘डिव्हायडर’ ला आदळून अपघात झाला. गाडी ‘डिव्हायडर’ ला आदळल्यावर ड्रायव्हरच्या बाजूने पलटी झाली व २५ ते ३० फुट घासत गेली. यावेळी मागील सीटवर बसलेला सुकुमार चौगुले व समोरील काचेवर आदळून गाडीखाली चेपला गेला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने खाजगी वाहनाने तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. तर महेश राजेंद्र मुद्राळे (२९) आणि पालक देवदत्त दगडू कुंभार हे दोघे किरकोळ जखमी झाले. या घटनेची तक्रार महेश राजेंद्र मुद्राळे (२९) रा. जाधववाडी मार्केट यार्ड कोल्हापूर यांनी दिली आहे.
सात मित्र तवेरा गाडीने (क्र. एमएच ११ बी.झेड ९०७५) फिरण्यासाठी १३ रोजी दांडेली कर्नाटक येथे गेले होते. एक दिवस फिरून मुक्काम करून १४ रोजी गोवा येथे गेले. गोव्यात उशिरा पर्यंत फिरून रात्री उशिरा कोल्हापूरला जाण्यास निघालो. मात्र, सकाळी ४.३० वा. च्या सुमारास गाडीला अपघात झाला. दरम्यान निष्काळजीपणा, हयगय, रस्त्याच्या विशिष्ठ परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकार पणे गाडी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.