रत्नागिरी ( आरकेजी): ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे मुंबई – गोवा महामार्गावरील १४ पुलांची कामे दहा महिन्यांपासून रखडले होते. शासनाने याप्रकरणी ठेकेदाराला नोटीस बजावून निर्धारित वेळेत काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी करणाऱ्या कामांचा अहवाल सादर करा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांची कामे जलदगतीने मार्गी लागण्याची शक्यता आहे.
गेल्या काही माहिन्यांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पुलांची कामे बंद आहेत. चौपदरीकरणापूर्वी महामार्गावरील पूल बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. बारा पूल आणि दोन रेल्वे पूलांच्या बांधकामासाठी १८७ कोटी रुपये शासनाने दिले. त्यापैकी दीडशे कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील तब्बल १४ पुलांची कामे ठेकेदारांमुळे ठप्प आहेत. तर अंजणारी, वाशिष्ठि, जगबुडी, शास्त्री, वाकेड अशा बारा पुलांची कामे अर्धवट स्थितीच आहेत. दोन वर्षात पूर्ण करण्याची मुदत दिली. परंतु, मुदतवाढ दिल्यानंतरही कामे प्रलंबित आहेत. नागपूरमधील ठेकेदाराला पुलांच्या पुनर्बांधणीचे काम देण्यात आले. मुख्य ठेकेदाराने हे काम पोट ठेकेदाराला दिले. मात्र पोट ठेकेदाराला पैसे न मिळाल्याने हे काम रखडल्याचे समोर आले. खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याप्रकरणी दाद मागितली. यानंतर पुलांचे बांधकाम करणारा सार्वजनिक विभाग अडचणीत आला. कामापोटी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ६४ कोटी दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, असा पहिला प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात आला. याचबरोबर पोट ठेकेदाराने सुरवातीपासून चांगले काम केल्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवावी, असा दुसरा प्रस्ताव पाठविण्यात आला. बांधकाम विभागाने बजावलेल्या नोटीसनंतर संबंधित ठेकेदार कंपनीने कामाची पुर्तता करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करताना ठेकेदार कंपनीला सशर्त मुदतवाढ दिली आहे. शिवाय पावसाळयापूर्वी कोणती काम पूर्ण करणार याचा अहवाल कंपनीकडून मागवून घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.