रत्नागिरी, (आरके) : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. महामार्गावर खेड तालुक्यात काल दोन भीषण अपघात झाले. त्यात तीघांचा मृत्यू तर १६ जण जखमी झाले. गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात हे अपघात घडले.
पहीला अपघात पहाटे साडेपाचच्या दरम्यान ट्रक आणि एसटी यांच्यात झाला. दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. यात परळ- ताम्हणम एसटीमधील १४ जण जखमी झाले.
दुसरा अपघात संध्याकाळी झाला. मुंबईहून गावी जाताना गुजर कुटुंबावर काळाने घाला घातला. खेड तालुक्यातील कळंबणी इथे ट्रक आणि स्वीफ्ट कार यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. त्यात तीघांचा जागीच मृत्यू झाला. कळंबणी रुग्णालयासमोर घटना घ़डली. अपघातात मृत झालेल्यामध्ये वंदना गुजर(४५), गजानन गुजर(५०) आणि चालक सखाराम चेंखलकर यांच्या समावेश आहे. प्रितम गुजर आणि प्रणाली गुजर यांच्यावर कळंबणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत खेड तालुक्यातील सोनवी गावचे रहिवासी होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.