
रत्नागिरी : बुधवारी जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे संध्याकाळी मुंबई-गोवा महामार्ग दिड तास ठप्प झाला होता. पावसामुळे परशुराम घाटात महामार्गाच्या चौपदारीकरणातील मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे परशुराम घाटात वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर आज पुन्हा हा प्रसंग ओढवला.
या महिन्यात अवकाळी पावसाने दुसऱ्यांदा हजेरी लावली. आजच्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या. दरम्यान पावसामुळे परशुराम घाटात चौपदरीकरणाच्या कामातील माती रस्त्यावर आल्याने सायंकाळी 4.30 वाजल्यापासून वाहतूक बंद होती. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गाड्या मध्येच अडकून पडल्या.. महामार्ग ठप्प झाल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून तात्काळ माती बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. माती बाजूला केल्यावर सायंकाळी सहा वाजल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू झाली.
यापूर्वी माती रस्त्यावर येऊन महामार्ग ठप्प झाला होता, मात्र ठेकेदार कंपनीने यातून कोणताही धडा घेतला नाही, त्यामुळेच आज पुन्हा एकदा वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.