
रत्नागिरी :मुंबई – गोवा महामार्गावरी खेड – राजापूर दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी ४० टक्के काम पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे आंदोलन छेडले जाईल,असा इशारा पक्षाचे प्रवक्ते नित्यानंद दळवी यांनी दिला आहे. या कामात अनेक प्रकारे गैरकारभार होत असून स्थानिकांवर अन्याय होत असल्याचा आरोपही दळवी यांनी यावेळी केला. दळवी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना दळवी म्हणाले की, खेड ते राजापूर या १९० कि.मी. मार्गावर चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. या कामाचा ठेका कल्याण इंन्फ्रास्ट्रक्चर, चेतक इन्फ्रास्ट्रक्चर, एमईपी आणि केसीसी या चार कंपन्यांनी घेतला आहे. मात्र हे काम करत असताना जुना रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. अपघातग्रस्तांना ठेकेदारांकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही. काम करताना कोणतीही सुरक्षितता बाळगली जात नाही. हे ठेकेदार बाहेरगावचे असल्याने स्थानिक ठेकेदारांना काम मिळेनासे झाले असल्याचेही दळवी यांनी सांगितले. दरम्यान, चौपदरीकरणातील ३० टक्के प्रकल्पग्रस्तांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही.त्यांच्या जमिनीच्या केसेस प्रांताधिकाऱ्यांकडे सुुरु आहेत. त्यामुळे या ठिकाणी अद्यापही कामाला प्रारंभ झालेला नाही. महामार्गावरील झाडांच्या मोजणीतही भ्रष्टाचार झालेला आहे. या मार्गावर शासनदरबारी ४० हजार झाडे दाखवण्यात आली आहेत. प्रत्यक्षात मात्र या निम्मी झाडे या मार्गावर आहेत. तोडलेल्या झाडांची वाहतूक करताना वाहतुक पासही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. तसेत तोडून ठेवलेल्या झाडांच्या चोरीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे ठेकेदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आरवली ते वाकेड मार्गाचे काम सुरु नसून, लोकप्रतिनिधींच्या आर्थिक देवाणघेवाणीत हे काम अडकले असल्याचा आरोप दळवी यांनी यावेळी केला. या पावसाळ्यापूर्वी खेड ते राजापूर दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम ४० टक्के काम पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा दळवी यांनी यावेळी दिला. यावेळी स्वाभिमान पक्षाचे मेहताब साखरकर, संकेत चवंडे, योगेश मगदुम आदि पदाधिकारी उपस्थित होते.















