रत्नागिरी (आरकेजी): मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाऊस थांबायची चिन्ह नाहीयेत, अशातच रस्त्यांवर झाडं, दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे.
संगमेश्वर–
मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा इथं दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक गेल्या १ तासापासून ठप्प आहे. प्रशासनाकडून सध्या दरड हटविण्याचं काम सुरु आहे.
चिपळूण-
मुंबई गोवा महामार्गावरील कापसाळ इथं भलं मोठं वडाचं झाड आज सकाळी रस्त्यावर पडल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक तब्बल एक तासाहून अधिक वेळ बंद होती. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने हे झाड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान गुहागर –चिपळूण मार्गावरील रामपूर घाटात दरड कोसळल्याने या घाटातून सध्या एकेरी वाहतूक सुरु आहे.
रत्नागिरी-
रत्नागिरीतल्या मांजरे गावात दरड कोसळल्यामुळे रत्नागिरी-राई-भातगाव – गुहागर मार्ग बंद झाला आहे. दरड हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची टीम दाखल झाली असून दरड हटविण्याचं काम सुरु आहे. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.