मुंबई, 12 जुलै : कोविड १९ साथीच्या आजारा विरुद्ध लढा देण्याच्या प्रयत्नात मध्य रेल्वे देशव्यापी लॉकडाऊन पासून मालगाड्या व पार्सल गाड्या चालवून वस्तूंची पुरवठा साखळी राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.
मजुरांची आणि वाहतुकीच्या सुविधांची मर्यादित उपलब्धता असताना मालवाहतूक करणे हे रेल्वेसाठी एक आव्हानात्मक काम होते. २३ मार्च २०२० पासून मध्य रेल्वेने २.७४ लाख वॅगन्समधून १४.४२ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.
मध्य रेल्वेच्या एकट्या मुंबई विभागात १,०७,९९३ वॅगन्सची मालवाहतूक करण्यात आली ज्यामध्ये ७४,५८५ कंटेनर वॅगन्स, खतांचे ११,०६६ वॅगन्स , पेट्रोलियम आणि तेल उत्पादनांचे ८४६३ वॅगन्स, लोह व स्टीलचे ५९६९ वॅगन्स, कोळशाचे ४४८५ वॅगन्स आणि इतर संकीर्ण वस्तूंचे ३४२५ वॅगन्सचा समावेश, रेल्वेसाठी उत्पन्नाचे साधन ठरले आहे.
मध्य रेल्वेने क्षेत्रिय (झोनल) आणि विभागीय (डिव्हीजन) स्तरावर मल्टीडिसिप्लीनरी बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयू) ची स्थापना केली आहे. वरीष्ठ अधिका-यांचा समावेश असलेला हा युनिट रेल्वेकडे जास्तीत जास्त माल वाहतूक आकर्षित करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधत आहे .