सदर लेख ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांच्या फेसबुक वॉल वरून साभार....
मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणताच अनेकांना आठवण होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांची. या दोघांचा काही काळ मुंबईवर वचक होता, हे खरंच. त्यांनी अनेकदा मुंबई बंद करून दाखवली. पण मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं विशेषण यांच्या मागे कधीच लागलं नाही. ते लागलं ते फक्त स. का. पाटील यांच्या नावाआधी. ते सांगतील, तशी मुंबई हालेल, असा त्यांचा दबदबा होता म्हणे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून त्यांच्यामुळे काँग्रेसला खूप मोठा निधी ते मिळवून देत असत. सर्व उद्योगपती त्यांच्या शब्दाला किंमत देत.
पण 1967 मध्ये लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघात जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांचा पराभव केला आणि मग त्यांच्या कारकीर्दीला जे ग्रहण लागलं, ते कधी संपलंच नाही.
स. का. पाटील हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते, हे खरं असलं तरी बहुसंख्य मुंबईकरांना ते नायक नव्हे, तर खलनायकच वाटत होते. ते तेव्हाच्या मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्रात मुंबई विलीन करायला त्यांचा तीव्र विरोध होता. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा देताना महाराष्ट्रास मुंबई द्यायला विरोध केल्याने ते मुंबईकरांच्या मनातून उतरले. ते सरदार पटेल आणि मोरारजी देसाई यांचे कट्टर समर्थक होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांचे मतभेद होते. किंबहुना ते नेहरू यांचे विरोधकच होते. ते मतभेद ते जाहीरपणे व्यक्तही करीत. तरीही अनेक वर्षं नेहरू यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात ठेवले.
स. का. पाटील यांना भाषावार प्रांत रचनाचं मान्य नव्हती. महाराष्ट्राला मुंबई देण्यास विरोध करण्यासाठी मोरारजी देसाई यांनी गिरगांव चौपाटीवर जी सभा घेतली, तिच्यात स. का. पाटीलही हजर होती. लोकांनी ती अक्षरशः उधळून लावली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत तीव्र आंदोलनं झाली. त्यावर पोलिसांनी गोळीबार केला, त्यात 16 जण ठार व अनेक जखमी झाले. त्यामुळे लोक खूपच चिडले, मुंबईत आंदोलन पसरत गेले. मोरारजी देसाई यांनी जमाव शांत झाला नाही, तर गोळीबार करा, असे आदेशच दिले होते म्हणे.
वातावरण इतके तापले असताना कोकणात जन्मलेले व नंतर मुंबईत आलेले, महात्मा गांधी यांच्या अनेक ब्रिटिशविरोधी आंदोलनात सहभागी झालेले व तुरुंगावास भोगलेले स. का. पाटील मात्र मुंबई कदापि महाराष्ट्राला मिळणार नाही, अशी भूमिका घेत राहिले. त्यांच्या या हट्टी भूमिकेमुळे ते केवळ मुंबई नव्हे, तर महाराष्ट्रातील लोकांच्या मनातून पार उतरले. मुंबईसाठी 106 जणांनी हौतात्म्य पतकरले होते, पण स. का. पाटील यांना काँग्रेसचे काही मराठी नेतेही पाठिंबा देत होते. पक्षात दोन गट झाले होते.
या प्रश्नावरून मुंबई व महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये फूट पडते की काय, अशी भीती केंद्रातील नेत्यांना वाटत होती. पण मुंबईसह महाराष्ट्र अशी मागणी करणाऱ्याचं प्राबल्य होतं. त्यामुळे नेहरू आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रासह मुंबई करण्याचा निर्णय घेतला. द्विभाषिक प्रांतरचना त्यांना मान्यच नव्हती, पण मुंबईचं स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याची भूमिकाही जवाहरलाल नेहरू यांनी सोडून दिली.
मुंबईसह महाराष्ट्राची अधिकृत घोषणा 1 मे 1960 रोजी नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतच एका समारंभामध्ये केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालतानाही यशवंतराव चव्हाण यांना पुढे केलं. महत्त्वाची बाब म्हणजे या समारंभाचं साधं निमंत्रणही स. का. पाटील यांना नव्हतं. समारंभ शांततेत, आनंदात व्हावा, पाटील यांना पाहून घोषणाबाजी, गोंधळ होऊ नये, म्हणून तसं केलं होतं. पण या अपमानामुळे 10 मेऐवजी स. का. पाटील 1 मे रोजीच परदेशात निघून गेले.
मात्र स. का. पाटील यांनी काँग्रेस सोडली नाही. पुढे 1962 च्या लोकसभा निवडणुकीत नेहरू व काँग्रेसने दक्षिण मुंबईतून त्यांनाच उमेदवारी दिली. गंमत म्हणजे आधीचा राग विसरून मुंबईकरांनीही त्यांना विजयी केलं आणि ते केंद्रात मंत्रीही झाले.
पण 1967 मध्ये मात्र स. का. पाटील यांना पडून जॉर्ज फर्नांडिस यांना विजयी केलं. केंद्रातील काँग्रेस नेत्यांनाही आता स. का. पाटील नकोसे झाले होते. त्यामुळे बहुदा इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून यशवंतराव चव्हाण यांनी जॉर्जना मदतही केली होती. चव्हाण यांनी एका ज्येष्ठ संपादकामार्फत जॉर्जना ती मदत दिल्ली होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर स. का. पाटील यांचा फोटो होता आणि त्याखाली ‘तुम्ही यांना पराभूत करू शकता’ एवढाच मजकूर होता.
त्या पराभवामुळे स. का. पाटील काहीसे खचूनच गेले. दोन वर्षांनी,1969 साली काँग्रेसमध्ये फूट पडली, तेव्हा पाटील यांनी इंदिरा गांधी यांची साथ सोडली आणि ते मोरारजी देसाई यांच्यामागे, त्यांच्या सिंडिकेट काँग्रेसमध्ये जाण्याचं ठरवलं. मुंबईत त्यांच्या पक्षाला स्थानच नव्हतं. त्यामुळे 1972 ची लोकसभा निवडणूक गुजरातच्या बनासकांठा येथून लढवली. पण तिथंही पराभूत झाले. तेव्हा मुंबईच्या अनभिषिक्त सम्राटाला आपलं राजकारण, कारकीर्द संपल्याची जाणीव झाली असावी. तरीही संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर ते इंदिरा गांधी यांच्या सांत्वणासाठी दिल्लीला गेले होते.
मात्र ते पुढे सार्वजनिक ठिकाणी फारसे दिसलेच नाहीत. मुंबईचे सलग तीनदा महापौरपद भूषवणाऱ्या, पुढे 1952 पासून केंद्रीय मंत्रिमंडळात असणाऱ्या, काँग्रेस व अन्य पक्षांच्या बड्या नेत्यांमध्ये उठबस असणाऱ्या या नेत्यांचं 24 मे 1981 रोजी निधन झालं. तेव्हा मुंबईकरांनी फारसं दुःखही व्यक्त केलं नाही.
Credit to lokmat