मुंबई – मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे; पण महापालिकेनेही ‘खड्डेमुक्त’ मुंबईसाठी तब्बल एक हजार १०६ रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. यापैकी सध्या ५२२ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये ४६ मुख्य रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. मात्र, पावसाळ्याला अवघा एक महिना उरला असल्याने ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे.मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्राधान्यक्रम ठरवून रस्त्यांची डागडुजी महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार यावर्षी एक हजार १०६ रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. यापैकी ५२२ कामे पावसाळ्यापूर्वी, तर उर्वरित ५८४ कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये अनुक्रमे ४६ आणि २७ मुख्य रस्त्यांचा समावेश आहे. वर्षाच्या सुरुवातीला आठशेहून अधिक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. यापैकी एप्रिल अखेरपर्यंत ८७९ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली.मुंबईत मेट्रो, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अशा विविध प्राधिकरणांची विकासकामे मुंबईत सुरू आहेत. मात्र, या खोदकामांमुळे त्या परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार असल्याने ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करण्याची ताकीदच महापालिकेने संबंधित प्राधिकरणांना दिली आहे. मात्र, अनेक ठिकाणी महापालिकेच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याने या भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मेची डेडलाइन पालिका प्रशासनाने रस्ते विभागाला दिली आहे.