मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रासह प्रामुख्याने मुंबई आणि उपनगरांत उमटले. महाराष्ट्रात बंद पुकारणाऱ्या आंदोलकांनी रास्तारोको, जाळपोळ, दगडफेक करून मुंबई बंद केली. रेल्वे वाहतूकही रोखून धरल्याने मुंबईकरांचे पूर्णतः हाल झाले. सांयकाळी पाचनंतर संप मागे घेण्यात आला. त्यामुळे रेल्वेसह रस्ते वाहतूक पूर्वपदावर येत आहे.
माटुंग्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सकाळी १० वाजता मोर्च्याला सुरुवात झाली. संतप्त आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली होती. सकाळपासूनच शहरातील छोटी -मोठी सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच कडकडीत बंदला सुरुवात झाल्याचे चित्र होते. सकाळी १० नंतर रेलरोको, रस्ता रोको सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम वाहतुकीवर व्हायला लागला. धारावी पोलीस स्टेशन पासून हा मोर्चा टी-जंक्शन मार्गावर येताच आंदोलकांनी बराच वेळ टी – जंक्शनवर ठाण मांडून आपला रोष व्यक्त केल्याने मोठया प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. भीमा कोरेगांव प्रकरणी भिडे व एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी करीत त्यांचे प्रतिकात्मक पुतळेही जाळण्यात आले.
भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्रात बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यानुसार ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी बंद पाळला. या बंदचा अधिक परिणाम मुख्यतः मुंबईत जाणवला. पक्षाच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक रोखून धरली. पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको केला. दहिसर, घाटकोपरमधील रमाबाई नगर येथे आंदोलक रस्त्यावर उतरले. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरही आंदोलन केले. एकंदरीतच मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनांही खबरदारीच्या सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात येत होत्या. सायंकाळपर्यंत अनेक ठिकाणी भीम सैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.