मुंबई : मुंबादेवी आणि परिसराचा विकास करण्यासाठी शासनाच्या आर्किटेकमार्फत विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
काल मुनगंटीवार यांनी मुंबादेवीचे दर्शन घेऊन तेथील दागिणा बाजारला भेट दिली. तेथील उद्योग- व्यापारी यांच्याशी चर्चा केली तसेच येथील मुंबादेवी उद्यानाचेही त्यांनी उद्घाटन केले. यावेळी आमदार राज पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन महाराष्ट्र असून त्यातही मुंबईचे योगदान सर्वाधिक आहे असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीमध्ये महाराष्ट्र भरीव योगदान देणार असून यातील २० टक्क्यांचा हिस्सा उचलणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा विकास दर वाढणेही अगत्याचे आहे. राज्याच्या क्षमता लक्षात घेता ही साध्य होणारी बाब आहे असेही ते म्हणाले.
राज्याच्या विकासात कररूपी योगदान देणारे व्यापारी-उद्योजक हे अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहेत. ते आपल्या उद्योग-व्यवसायाच्या भरभराटीतून मोठ्या प्रमाणात शासनाकडे कर भरतात,देशाला मजबूत करतात. त्यातूनच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, वंचितांच्या विकासासाठी शासन योजना आखतं, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुंबादेवी येथील चौकाचे सौंदर्यीकरण करण्याचा प्लान व्यापारी वर्गाने यावेळी सादर केला. त्यावर केवळ चौकाचाच नाही तर मुंबादेवी मंदिरासह परिसराचा विकास करण्यासाठी, लोकांच्या आवश्यक त्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध करून देण्यासाठी चांगला, सर्वंकष प्लान बनवला जाईल आणि त्यासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल. जीएसटीच्या अंमलबजावणीत राज्यातील सर्व उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी खुप चांगले सहकार्य केल्याचेही श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुनगंटीवार यांनी यावेळी पालिकेच्या मुंबादेवी उद्यानाचे उद्घाटन करुन येथे वृक्षारोपणही केले.
मुनगंटीवार आव्हान स्वीकारणारे मंत्री- राज पुरोहित
जागतिक स्तरावर पर्यावरणीय बदलांचे आव्हान उभे राहिले असतांना ५० कोटी वृक्ष लागवडीतून त्यावर मात करण्याचा प्रयत्न वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ते आव्हान स्वीकारणारे मंत्री आहेत, असे आमदार राज पुरोहित यांनी सांगितले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून आपला मतदार संघ या राजधानीला सक्षम बनवण्यामध्ये सर्वाधिक योगदान देतो. साधारणत: दीड कोटी लोक या भागात नोकरी-उद्योग-व्यवसायासाठी येतात. इथला व्यापारी वर्ग प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. सर्वात विश्वासार्ह बाजार म्हणून या दागिणा बाजारची ओळख आहे असेही ते म्हणाले.
राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करतांना व्यापारी वर्गाला विश्वासात घेऊन ती केल्याबद्दल मुंबादेवी दागिणा बाजार असोसिएशनच्या वतीने मुनगंटीवार यांचे आभार मानण्यात आले.