कोकणवृत्तसेवा विशेष
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. शिवसेना, भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्र्वादी, मनसे हे प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यानुसार मुंबईची आई मानली जाणारी मुंबादेवी कोणत्या पक्षाला कौल देते? हे येत्या काही तासांतच कळणार आहे. गुरुवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि कोण जिंकले, कोण हरले हे स्पष्ट होईल. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने देशभरात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महापालिकेत सत्तेतील वाटेकरी असणारे शिवसेना- भाजपा हे पक्ष या निवडणुकीत स्वबळावर एकमेकांविरोधात लढले. प्रचारादरम्यान प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळवण्यात हे पक्ष यशस्वी झाले. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तर अनेक प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोल प्रसिध्द केले. यात शिवसेना आणि भाजपाला पसंती देण्यात आली आहे. असे असले तरी २३ फेब्रुवारीलाच कोण जिंकले हे स्पष्ट होणार आहे.
या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपामधील सत्तासंघर्ष तीव्रतेने उफाळून आल्याचे दिसले. दोन्हीही पक्षांनी आम्हालाच बहुमत मिळणार, असा दावा केला आहे. परंतु, मतमोजणीनंतर गरज भासल्यास एकत्र येणार का? या प्रश्नावर मात्र या पक्षांनी चुप्पी साधल्याचे पाहायला मिळाले. कॉंग्रेसमधील गटबाजीमुळे या पक्षाला आक्रमक झेप घेता आलेली नाही. मनसेनेही उशिरा प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे मुख्य सामना शिवसेना-भाजपात होतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोणत्याही परिस्थितीत मुंबई पाहिजेच, असा पण करत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आणि मुंबईतील प्रचारसभा त्यांनी गाजवल्या. कोणे एकेकाळी दरारा असणार्या शिवसेनेला मुंबईत आव्हान देणारा कोणीतरी आहे, असा संदेश रुजवण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांविरुद्ध आघाडी उघडत, वातावरण पेटते ठेवले. त्यांच्या अनेक प्रश्नांनी भाजपा घायाळ झाली. इतकी की, सामना या दैनिकावर बंदी आणाण्याची मागणी केली गेली. या बंदीलाही सेनेने चोख प्रत्युत्तर दिले.
मनसे संपली अशी आवई प्रसारमाध्यमांनी उठविली होती. परंतु, राज ठाकरे यांनी प्रचारात भाग घेतला आणि माध्यमांनी आपला झोत त्यांच्याकडे वळविला. राज यांच्या विक्रोळी कन्नमवार नगरातील पहिल्याच सभेला तुफान प्रतिसाद मिळाला. यानंतर पुढील प्रत्येक सभा त्यांनी गाजवल्या. आता या सभांचे मतांमध्ये किती रुपांतर होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कॉंग्रेस, राष्ट्र्वादी कॉंग्रेस हे विरोधी पक्ष प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहिले. न पेक्षा शिवसेनेने या पक्षांना संधीच दिली नाही, असे म्हणणे अधिक शहाजोगपणाचे ठरेल. अर्थात मतदारराजाच्या मनात काय आहे? ते आता सांगता येत नाही. कदाचित निकालाचे चित्र वेगळे असेल आणि कौल काही वेगळाच असेल. जो २३ तारखेला समजेल.