मुंबई : महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीन आणि मतदान प्रक्रियेत घोळ करून भाजपाने जागा जिंकल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मुलुंडमध्येही असाच प्रकार घडवत भाजपाने सर्वच्या सर्व सहा जागा भाजपाने जिंकल्या, असा आरोप करत मुलुंडमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांनी आपल्या शेकडो समर्थकांसह निषेध मोर्चा काढला.
मुलुंड रेल्वे स्थानकापासून पालिकेच्या टी विभागापर्यंत निषेध मोर्चा निघाला. भाजपा आणि खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. पाच रस्त्यावर रास्ता रोकोचा प्रयत्न झाला.
टी विभाग कार्यालयात घुसण्याचा प्रयत्नदेखील झाला. यावेळी पोलिसांनी अटकाव केला. नंतर विरोधकांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांची भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे निवेदन त्यांना देण्यात आले.
मनसे , काँग्रेस , मनसे , आरपीआय , शिवसेना , संभाजी ब्रिगेड आदी सर्वच पक्षांनी सहभाग नोंदविला. उमेदवाराला त्याच्या स्थानिक बूथमधून देखील मते मिळाली नाहीत? असा प्रश्न विचारण्यात आला. भाजपाचे आमदार सरदार तारासिंग मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात जाऊन भाजपलाच मतदान करा, असे सांगत होते, असा आरोप आंदोलकांनी केला. या घोटाळ्याची चौकशी न झाल्यास सर्व पक्ष मुलुंड बंद पुकारतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.