मुंबई : मुलुंडहून देवदर्शनासाठी निघालेल्या आठ जणांसह ११ जणांवर आज पहाटे काळाने घाला घातला. एका खासगी बसमधून ते प्रवास करत असताना अचानक रान डुकर आडवे आले आणि चालकाचे नियंत्रण सुटून समोरून येणार्या ट्रकला बस धडकली. पुणे-सोलापूर महामार्गावर उरळी कांचन येथे ही भीषण घटना घडली. ज्योती काळे, विजय काळे, रेवती चव्हाण, योगिता चव्हाण, जयवंत चव्हाण, योगेश लोखंडे, चालक केतन पवार या मुलुंडमधील रहिवाशांचा तर सुलभा अवचट, प्रदीप अवचट आणि शैलजा पंडित या पुणे येथील प्रवाशांचा यात मृत्यू झाला. मृतांत एका लहान मुलीचाही समावेश आहे.
शुक्रवारी (ता.१०) रात्री नऊ वाजता काळे आणि चव्हाण कुटुंब देवदर्शनासाठी खासगी बसने पुणे मार्गे सोलापूर अक्कलकोटला निघाले होते. घटनेची माहिती मिळताच काळे कुटुंब राहत असलेल्या नीता अपार्टमेंटमध्ये तर चव्हाण कुटुंब राहत असलेल्या सज्जनवाडी विभागावर शोककळा पसरली. अनेकांना अश्रू अनावर झाले होते. आज रात्री उशिरापर्यंत दोन्ही कुटुंबासह इतर दोघांचे मृतदेह मुलुंडमध्ये आणले जाणार आहेत. काळे कुटुंबावर गव्हाणपाडा येथे आणि काळे कुटुंबावर टाटा कॉलनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
