
मुंबई, 18 जून : लडाखमधील गलवाण खोऱ्यात चिनी सैन्यांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले. चीनचा निषेध करत आज मुलुंड येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जी जिनपिंग यांच्या प्रतिमेचे दहन केले. तसेच चीनला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. याचे पडसाद देशात देखील उमटत आहेत. कॉग्रेसनेही या हल्ल्यानंतर आक्रमक होत जी जिनपिंग यांची प्रतिमा जाळली. यावेळी चीनच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या.
चीनचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मुलुंड काँग्रेसच्या वतीने चीनच्या राष्ट्राध्यक्षाची प्रतिमा जाळली. तसेच चीन आपल्या देशाच्या भूमीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचादेखील आम्ही विरोध करत आहोत. आपल्या जमिनीचा 1 इंच तुकडा देखील दिला नाही गेला पाहिजे, असे काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हा सरचिटणीस राजेश इंगळे यांनी सांगितले.














