
मुंबई : मुलुंड पश्चिमेला बालगोपाळांनी बाप्पासाठी ‘पर्यावरणपूरक वन’ साकारलं आहे. या वनात टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले वन्यप्राणी, वृक्ष, फांद्या ठेवण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे गणपतीची मोठी मुर्तीही फायबरची बनविण्यात आली आहे. तर लहान मूर्ती शाडू मातीने साकारली आहे. ‘एक पाऊल पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्न करा’ असा संदेश आम्ही यावेळी देत आहोत, असे शांती नगर रहिवाशी संघाचे शाम बारोट यांनी सांगितले.
शांतीनगर, जे.एन.रोड,गोशाळा रोड जंक्शन,मुलुंड पश्चिम येथे हा पर्यावरणपूरक बाप्पा स्थानापन्न झाला आहे. मुलुंडचा पहिला इकोफ्रेंडली, अशी या मंडळाची ख्याती आहे. गेल्या २६ वर्षांपासून तसेच ९ वर्षांपासून पर्यावरणाची सुरक्षितता लक्षात ठेऊन इकोफ्रेंडली पद्धतीने बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत येथे गणेशोत्सव साजरा केला जातो.
या वर्षीची थीम वन आहे. ज्यात बाप्पाची मोठी मुर्ती फायबरची ६ फूट उंच तर लहान मुर्ती शाडू मातीची २ फूट आहे. सजावटीसाठी टाकाऊपासून टिकाऊवस्तु तयार करण्यात आल्या आहेत. ज्यात माकड, नर ससा, मादी ससा,सशा चे पिल्लू,सुतार पक्षी, घुबड़, खार आदी दाखविण्यात आले आहे. तसेच वृक्ष, पाने, फांद्या बनविण्यात आल्या आहेत. सजावट तयार करण्यासाठी परिसरातील बालगोपाळांनी सहभाग घेतला. तसेच फायबरने बनविलेल्या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. कोणत्याही प्रकारचा गोंगाट या ठिकाणी होत नाही. शाडूच्या मूर्तीसाठी नैसर्गिक रंग वापरण्यात आले आहेत. या मूर्तीचे विसर्जन केले जाते. उत्सव साजरा करतांना ध्वनी आणि वायू प्रदूषण केले जात नाही, असे बारोट यांनी सांगितले.
मोसेस पीटर, प्रिया परमार, श्याम बारोट आदींसह बालगोपाळ पर्यावरणपूरक उत्सव साजरा होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.















