मुंबई: मुलुंडमधील नाणेपाडा भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला तब्बल ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाने जेरबंद केले. त्यापूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ७ जण जखमी झाले. जखमींना पालिकेच्या शीव रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे.
मुलुंडच्या पूर्व भागातील नाणेपाडा परिसरातील दाट वस्तीत शनिवारी पहाटे एक नव्हे तर दोन बिबटे घुसले. स्थानिक नागरिकांचा यामुळे थरकाप उडाला. बिबट्या पहाण्यासाठी अनेकांनी तौबा गर्दी केली. काहींनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिबट्या बिथरला आणि त्याने स्थानिक लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यात बालाजी कामटे (४०), कृष्ण पिल्ले(४०), सविता कुटे(३०), गणेश पुजारी(४५) यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्या घुसल्याची बातमी वन विभागाला व पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्यांना पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र, लोकांच्या गर्दीमुळे बिबट्यांना पकडण्यात अडथळे येत होते. अखेर ६ तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले.
नेटिझन्सकडून सोमय्या ट्रोल
मुलुंडमधील नानीपाडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यासोबत सेल्फी काढणे खासदार किरीट सोमय्या यांच्या चांगलेच अंगलट आले असून नेटिझन्सने त्यांना जबरदस्त ट्रोल केले. ट्विटरवर बिबट्याचा उल्लेख सोमय्या यांनी टायगर (वाघ) असे केल्याने त्यांना वाघच दिसतो का ? टायगर अभी जिंदा हे असे म्हणत नेटिझन्सनी त्यांना फैलावर घेतले. सोमय्या यांना सेल्फी ऑफ तर इयर दिला पाहिजे, त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? अशा विविध संतप्त प्रतिक्रिया सोमय्यां यांनी जखमीचे काढलेले फोटो पाहून नेटिझन्स नोंदवल्या आहेत. यावर, मला तिकडच्या लोकांनी सांगितले की 2 वाघ शिरले होते म्हणून मी ते ट्विट केले अशी सारवासारव सोमय्या यांनी केली.