मुंबई : येत्या ऑक्टोबर पासून मुलुंड डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामुळे मुलुंडमध्ये टाकला जाणारा कचरा आता कांजूरमार्ग डंपिंगवर टाकण्यात येणार आहे. पालिकेने यासाठी ७३१ कोटी रुपयांचे कंत्राट कचरा वाहतूक करण्यासाठी दिले आहेत.
मुलुंड डपिंगवर गेल्या ४४ वर्षांपासून कचरा टाकला जातो. सध्या तेथे ७० लाख मेट्रीक टन कचरा जमा झाला आहे. त्यातील ६० लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन भूखंड रिकामा करण्यात येणार आहे. या डंपिंगची क्षमता संपल्याने तेथे वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा या डंपिंगला प्रचंड विरोध होता. डंपिंग बंद करण्यासाठी रहिवाशांनी आंदोलनेही केली. मात्र त्यावर निर्णय़ होत नव्हता. आता मुलुंड डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपल्याने हे डंपिंग १ ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील तब्बल २४ हेक्टरचा भूखंड कचऱ्यातून मुक्त होणार आहे. यासाठी पालिका ७३१ कोटी रुपयांच्या खर्च करणार आहे. मागील दीड वर्षांपासून मुलूंड डंपिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी महापालिकेला कंत्राटदारच मिळत नव्हते. मात्र, आता कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेस प्रतिसाद दिला आहे. कंपन्यांनी निविदांसंबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच कार्यादेश देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, असे घन कचरा विभागातून सांगण्यात आले. दरम्यान येथील ५०० मेट्रिक टन कचरा कांजुर डंपिंगवर टाकला जाणार आहे. कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी कंत्राटदाराची सहा वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई बाहेर नवीन दोन ठिकाणी डंपिंग ग्राऊंडचा पर्याय उपलब्ध झाला असल्याचे सांगण्यात आले.















