मुंबई : मुलुंड जिमखान्याच्या ताब्यात असणार्या राजे संभाजी मैदानाचा पाच हजार चौरस मीटरचा भूखंड पालिकेने आज (ता.९) ताब्यात घेतला आणि नागरिकांसाठी मोकळा केला. पालिकेने दत्तक तत्वावर दिलेला भूखंड जिमखान्याकडून खासगी मालमत्ता असल्यासारखा वापरण्यात येत होता. अखेर पालिकेने जिमखाना प्रशासनाला चांगलाच दट्ट्या दिला. जिमखान्याने पालिकेच्या अटी व शर्तींचा भंग केल्याने कारवाई करण्यात आली, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
इतर नागरिकांना या ठिकाणी येण्यास मज्जाव केला जात होता. पालिकेची परवानगी न घेत लग्न सोहळेदेखील केले जात होते. काही दिवसापूर्वी या भूखंडावर मद्य पार्टी ठेवण्यात आली होती. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने येथे धाड टाकून दारूचा साठा जप्त केला होता. काही जणांना अटकदेखील करण्यात आली होती. त्यामुळे पालिकेने हा भूखंड पुन्हा ताब्यात घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. अखेर कडक कारवाई करण्यात आली. सदर भूभागावार मुलुंड जिमखानाच्या कोणताही संबंध नाही, असा फलक देखील तेथे लावण्यात आला आहे. पालिकेने केलेल्या धाडसी कारवाईबद्दल मुलुंड मधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
पालिकेने आमच्यावर अन्याय केला : जिमखाना प्रशासन
जिमखान्याचे अध्यक्ष चेतन साळवी म्हणाले की ” पालिका आमच्यावर अन्याय करीत आहे. या विरोधात आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोत”.