मुंबई : मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावर हलक्या वाहनांना एक महिना टोल मुक्त केल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात सांगितले.
मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडीवर तातडीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. यामुळे उद्या 21 ऑगस्टपासून टोलनाक्यावर हलक्या वाहनांना एक महिना टोल भरावा लागणार नाही. टोलनाक्यावरील कोंडी फोडण्यासाठी कायमस्वरुपी उपाय म्हणून मुलुंड टोलनाक्यावर बुथची संख्या वाढविण्यासाठी उन्नत रस्ता करुन डबलडेकर टोल नाका उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही टोल वसुली करणाऱ्या एमईपी कंपनीला देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीच्या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.
मुंब्रा बायपासची दुरुस्ती सुरु असल्यामुळे नवी मुंबईकडून येणारी सर्व वाहने ऐरालीमार्गे मुलुंडहून ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गाने नाशिक आणि अहमदाबादच्या दिशेने जात आहेत. तसेच या दोन ठिकाणाहून येणारी वाहतूकही याच मार्गे नवी मुंबईला जात असल्याने ठाण्यातील रस्त्यावर आणि विशेषत: टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. मुंब्रा बायपास रस्त्याचे काम दहा सप्टेंबरपर्यंत सुरु करण्याचे आदेश यापूर्वीच दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीवर तातडीचा उपाय म्हणून एक महिना मुलुंडचे दोन्ही टोल नाके आणि ऐरोलीचा टोल नाक्यावर हलक्या वाहनांच्या टोल वसुलीस 23 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.