रत्नागिरी- प्रतिनिधी- मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना लाभदायी आहे. मुलींना या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन डाक विभागाने करत आहे. जागतिक टपाल सप्ताहानिमित्त रत्नागिरी एसटी बसस्थानकावर रत्नागिरी डाक विभाग आणि अनुलोम या संस्थेद्वारे खात्याच्या योजनांची माहिती प्रवाशांना देण्यात आली. हजारो प्रवासी, विद्यार्थी, शालेय विद्यार्थिनी, महिला, शेतकर्यांनी या योजनांची माहिती समजावून घेऊन योजनांच्या लाभार्थीसाठी नोंदणीही केली.
अटल पेन्शन योजना ही सर्वात उत्तम योजना असल्याचे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले. तसेच काहींनी या योजनेसाठी नावनोंदणीही केली. अटल पेन्शन योजनेत वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा एक हजार ते पाच हजार रुपये पेन्शनस्वरूपात मिळू शकतात. त्यासाठी 18 ते 39 या वयातील व्यक्ती दरमहा पैसे भरू शकतात. 60 वयापर्यंत पैसे भरल्यानंतर पेन्शन सुरू होते.
विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानुसार प्रथमच बसस्थानकावर टपाल खात्याने सर्वसामान्य प्रवासी, नागरिक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून योजनांची माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा व जीवनज्योती विमा योजना या योजना टपाल खात्यातर्फे राबवल्या जातात. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना लाभदायी आहेत. या योजनेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक टपाल कार्यालयातर्फे भरपूर मुलींचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. खाते उघडल्यापासून 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे खाते बंद करता येते. 14 वर्षे 100 च्या पटीत रक्कम जमा करता येते. असंघटित कामगारांसाठी अटल पेन्शन योजनाही उपयुक्त आहे. यामध्ये वयाच्या साठीनंतर 1 ते 5 हजार रुपयांपर्यंत दरमहा पेन्शन मिळू शकते. या योजनांची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी सहायक डाकघर अधीक्षक जी. पी. तळगावकर, विपणन अधिकारी गजानन करमरकर, सहायक अधीक्षक विनायक कुलकर्णी, अनुलोमचे स्वप्नील सावंत, रवींद्र भुवड, श्री. पाथरे आदी उपस्थित होते.