मुंबई : शेतकरी आनंदी हवा ही शासनाची भूमिका राहिली आहे. कर्जमुक्ती हा प्राथमिक उपचार असला तरी शेतीच्या विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीबद्दल राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या वतीने आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री जयंत पाटील, खासदार विनायक राऊत, गटनेते अनिल परब, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्राजक्त तनपुरे, लक्ष्मण वडले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आपला अन्नदाता सुखी असावा हीच आपली भावना असते. शेतकऱ्यांसाठी या सरकारचे दरवाजे कायम खुले असतील. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार समर्थपणे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांसाठी या सरकारचे दरवाजे कायम खुले असतील. आता दिलेली कर्जमुक्ती ही शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठीचा केवळ प्रथमोपचार असून या सरकारच्या वतीने शेती विकासासाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सूचनांना हे सरकार कायमच प्राधान्य देईल आणि शेती बाबतचे धोरण ठरविताना नेहमीच शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिली.
अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही कर्जमाफी अंमलबजावणी बाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली.
किसान क्रांती, राष्ट्रीय किसान महासंघ तसेच अन्य संघटनाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे आभार मानले. ठाकरे सरकारने आता दिलेली कर्जमुक्ती ही शेतकऱ्यांना कुठेही रस्त्यावर येऊ न देता शब्द दिल्याप्रमाणे जाहीर केली आहे. या कर्जमुक्तीमुळे राज्यातील 80 टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा होत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे, असे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले .
यावेळी शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बैलगाडीची प्रतिकृती व राज्यांमध्ये विविध ठिकाणी पिकणारी फळे, भाजीपाला व धान्य भेट स्वरूपात देण्यात आले.
याशिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना उचित न्याय मिळावा, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, कर्जमुक्तीच्या योजनेमध्ये उपसा जलसिंचन योजनांची कर्जे समाविष्ट करून घेण्यात यावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समन्वय समिती स्थापून वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, आदी मुद्द्यांबाबत शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी सर्वश्री संदीप गिड्डे, लक्ष्मण वंगे, शंकर दरेकर, अरूण कान्होरे, नितीन थोरात, माऊली हळणवार, उमेश शिंदे, विजय गाजरे, माधव पाटील, राजाराम पाटील, नितीन बागल, शहाजहान शेख, धनाजी चव्हाण, युवराज सुर्यवंशी, महेश राणे, अतिश गरड, योगेश ओव्हाळ, तुकाराम सुर्यवंशी, सौरभ वाव्हळ, ओंकार बिरदवडे, दत्तात्रय गाजरे उपस्थित होते.