मुंबई : सामाजिक समरसतेत शेवटच्या घटकाचा विकास हे प्राधान्याने येते. त्यामुळे राज्यातील कामगार, शेतकरी आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षितांच्या विकासाची गुढी उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सरकारच्या या प्रयत्नांना राज्यातील जनतेने सकारात्मकतेने पाठिंबा देऊन समरसतेच्या संकल्पाची गुढी उभारावी, असे आवाहन करत गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील शेती आणि शेतकऱ्याचा शाश्वत विकास हाच उद्देश ठेऊन राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प मांडला आहे. राज्यातील कृषी विकासाचा दर वाढविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, त्यासाठी सर्वच घटकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत गुढी पाडवा आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या मराठी नववर्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाडव्यानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रा या आपल्या सामाजिक एकतेचे प्रतिक बनल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.