रत्नागिरी दि. ३१ : महाराष्ट्र शासनाने जिल्हयातील बेरोजगार युवकांना बँकेकडून सहज व सोप्या पध्दतीने अर्थसहाय देऊन स्थानिक युवकांना स्वयंरोजगाराकडे प्रेरित करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सन २०१९-२० पासून कार्यान्वित केली आहे.
जिल्हयातील युवक युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून जिल्हयात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहायातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे हा या योजनाचा उद्देश आहे. त्यासाठीच्या पात्रता, अटी पुढीलप्रमाणे आहेत.
१) राज्यात स्थानिक अधिवास असलेल्या व किमान १८ ते ४५ वयोगटातील स्वयंरोजगार करु इच्छिणारे उमेदवार विशेष प्रवर्गासाठी (अनूसूचित जाती/जमाती/महिला/अपंग/माजी सैनिक) ५ वर्षांची अट शिथिल.
२) रु.१० लाख मर्यादेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी शिक्षणाची अट नाही. तसेच, रु. १० लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता ७ वी पास व रु.२५ लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान १०वी पास.
३) अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या/महामंडळाच्या
योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
प्रकल्प मर्यादा किंमत – प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रु.५० लाख व सेवा/कृषी पूरक उद्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी कमाल रु.१० लाख आहे.
अर्जासोबत अनिवार्य Online Upload करावयाची कागदपत्रे Passport Size Photo (पारपत्र आकाराचे छायाचित्र), आधार कार्ड, जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता तपशिल, प्रकल्प अहवाल, विहित नमुन्यातील हमी पत्र(नमूना https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे) वैकल्पिक कागदपत्र- जातीचा दाखला/जात वैधता दाखला, विशेष प्रवर्ग दाखला, आरईडीपी/ईडीपी/कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास), महाराष्ट्र राज्याबाहेरील जन्म असल्यास अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची संपूर्ण ऑनलाईल पध्दतीने अंमलबजावणी होईल.यासाठी maha-cmegp.gov.in हे विशेष पोर्टल अर्जदारांसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. योजने अंतर्गत पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय, रत्नागिरी, दूरध्वनी केंद्रासमोर, जेलरोड, रत्नागिरी – 415612, दूरध्वनी क्रमांक (02352)222254, 224829, ईमेल didic.ratnagiri@maharashtra.gov.in संपर्क साधावा किंवा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांनी सदर पोर्टल वर अर्ज Upload करावा असे आवाहन सौ. विद्या कुलकर्णी ,महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी यांनी केले आहे.















