नाशिक : राज्यातील दहा महापालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्या असून प्रकार शिगेला पोहचला आहे. आज नाशिक येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली. भाजपला पर्यायी शब्द थापा आहे आणि आपले मुख्यमंत्री हे भाजपकुमार थापाडे आहेत, अशी बोचरी टीका राज यांनी केली. नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ते येथे आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कल करताच एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. नाशिकमधील या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
या निवडणुकीत मनसेतील अनेक नेते पक्ष सोडून गेले. यावर राज म्हणाले की, नाशिक महापालिकेत मी कोणालाही भ्रष्टाचार करु दिला नाही. त्यामुळेच अनेकांनी मनसे सोडली. भाजपने पैसे फेकल्याने काही लोक भाजपमध्ये गेले. जे गेले ते आपल्यासाठी मेले, असेही राज म्हणाले.
सिंहस्थ कुंभमेळाच्यावेळी केंद्र व राज्य सरकारने नाशिकसोबत दुजाभाव केला, असा आरोप त्यांनी केला. स्वीस बँकेतून काळा पैसा आणण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, या वक्तव्याच्यादेखील राज यांनी ठाकरी शैलीत समाचार घेतला. नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचे सादरीकरण करत मनसेला मत देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.