मुंबई : निवासी डाॅक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे हाल होत आहेत, मॄत्यू होत आहेत. यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्र्यांचा आज संयम सुटला आणि ते प्रचंड संतप्त झाले. आता संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
डाॅक्टरांना सुरक्षेची हमी देण्यात आली आहे. त्यांच्या इतर सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. तरिही ते कामावर येण्यास तयार नाहीत. उच्च न्यायालयानेही त्यांना कामावर रुजू होण्याची सूचना केली तरीही हे कामावर येत नाहीत. आणखी किती संयम दाखवायचा ? इनफ इज इनफ, राज्यातील गरीब रूग्ण मृत्यूशय्येवर आहे. आज शेवटची बैठक मी घेणार आहे, त्यात त्यांना हात जोडून कामावर कामावर रूजू होण्याची मी विनंती करेन. जर त्यांनी ऐकले नाही तर कायदेशीर कारवाईस त्यांना सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवासी डॉक्टरांना निर्वाणीचा इशारा दिला.
निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत निवेदन सादर केलं. डॉक्टरांनी आडमुठे धोरण स्वीकारल्याने फडणवीस चांगलेच संतापले होते.
गंभीर दखल घेऊन, उच्च न्यायालयने डॉक्टरांना कामावर तातडीने रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांनी माघार घेतलेली नाही. रुग्णांना मरणाच्या दारात सोडणार असाल तर ते खपवून घेतले जाणा नाही. कामावर परत या, शपथेला विसरु नका, देवाचा दर्जा दिलाय, दानव बनू नका, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी संपकर्यांना करून दिली.