रत्नागिरी (आरकेजी): मंडणगड नगरपंचायतीत मुख्याधिकारीच नसल्याने अनेक कामांमध्ये अडथळे येत होत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी कार्यालयाला आज टाळ ठोकले.
मार्च २०१५ साली या मंडणगड नगरपंचायतीची स्थापना झाली आणि स्थापनेपासून या नगरपंचायतीला हक्काचा मुख्याधिकारीच मिळालेला नाही. सध्या या नगरपंचायतीचा चार्ज हा खेडचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे आहे. मात्र आज(शुक्रवार) घेण्यात आलेल्या विशेष सभेला खेडचे मुख्याधिकारी उपस्थित राहीले नाहीत. खेडचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या परवानगीनेच आजची विशेष सभा घेण्यात आली होती. ८ डिसेंबरला सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती, या सभेला रोडगे उपस्थित होते. त्यानंतर दोन तारखा देण्यात आल्या, मात्र त्या कँन्सल करुन आज सभा घेण्यात आली. मात्र या सभेला रोडगे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आज संतप्त नगरसेवकांनी थेट मुख्याधिकारी कार्यालयालाच टाळं ठोकले. नगरपंचायतील १ कोटी ५० लाखाची विकास कामं पडून आहेत, त्यांचे टेंडर देखील निघालं आहे. मात्र मुख्याधिकारी नसल्यानं आता विकास कामात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नगरसेवकांनी मुख्याधिकारी कार्यालयाला टाळं ठोकले.