रत्नागिरी : खास दिवाळीनिमित्त दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतिन पुजारी यांनी 1 नोव्हेंबरला केले.
यंदाचे हे 35 वे हस्तकला प्रदर्शन आहे. या वेळी डॉ. पुजारी म्हणाले की, मूकबधिर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वस्तू पाहून विश्वासच बसणार नाही. दिवाळीसाठी बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे सुरेख प्रशिक्षण शाळेत मिळते. जीवनोपयोगी वस्तू बनवल्यामुळे त्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो. शिक्षण आणि कला यांचे सुरेख संगम येथे पाहायला मिळाला. रांगोळ्या, पणत्या, छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे छोटे पुतळे, उटणे, कापडी व लाकडी वस्तू-खेळणी, ग्रीटिंग्ज, करवंटीपासून वाद्यांचे शो-पीस पाहून डॉ. पुजारी यांनी अभिनंदन केले. शाळेमध्ये 39 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माजी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे स्टॉलही मांडले आहेत. प्रदर्शनानिमित्त काढलेली भव्य रांगााेळी पाहून डाॅ. पुजारी यांनी अानंद व्यक्त केला.
संस्थेच्या कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापिका सौ. अनुराधा ताटके, माजी मुख्याध्यापक अरुण फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित्रा बोडस, सदस्य सौ. अर्चना जोशी, कलाकार शेखर जोशी, शिक्षक गजानन रजपूत, रमेश घवाळी, मंगल कोळंबेकर, सीमा मुळे, उपासना गोसावी, गायत्री आगाशे, स्पृहा लेले, प्रतिमा बोरकर, शीतल केळकर, दीप्ती खेडेकर, हनुमंत गायकवाड हे कर्मचारी उपस्थित होते.