रत्नागिरी : येथील (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात रविवारी सकाळी जागतिक दिव्यांग दिन साजरा झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळत आनंदोत्सव साजरा केला.
दिव्यांग दिन कार्यक्रमात सुरवातीला विद्यार्थी, पालकांना दिव्यांग दिनाची माहिती सांगण्यात आली. दिव्यांगांचे २१ प्रकार समजावून सांगण्यात आले. त्यानंतर फनी गेम्सचे आयोजन केले. यात फुग्याने पेला पुढे ढकलणे, मणी ओवणे, बेडूक उड्या, लगोरी यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या खेळांचा आनंद लुटला.
दिव्यांग दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी सुमारे ३० रंगावल्या साकारल्या. यात गणपती, आकाशकंदील, फुलांची कुंडी, कलात्मक रंगावली साकारली. तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धाही घेण्यात आली. या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ उद्या (ता. ४) सकाळी 11:30 वाजता विद्यालयात होणार आहे. या वेळी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्ष सौ. शिल्पा पानवलकर व क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत. या वेळी विजेत्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लबच्या माध्यमातून बक्षीसे दिली जाणार आहेत. मुख्याध्यापक गजानन रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक रमेश घवाळी, सीमा मुळ्ये, राजकुमार कसबे, संतोष शिंदे, लिपीक दीप्ती खेडेकर, साक्षी वासावे, हनुमंत गायकवाड यांच्यासमवेत पालकांनी मेहनत घेतली.