
रत्नागिरी : संविधान सन्मान मंच, रत्नागिरी यांच्या वतीने देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी आज राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (मारुती मंदिर) येथून सुरू झालेल्या या पदयात्रेची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे झाली.

या पदयात्रेत भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते युवक, युवती, विद्यार्थी आणि हजारो देशप्रेमी नागरिक सहभागी झाले. देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचविणाऱ्या कृत्यांचा निषेध, राष्ट्रहित, संविधानाचा सन्मान आणि सामाजिक ऐक्याचा संदेश शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने देण्यासाठी या मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं..
देशाच्या व्यवस्थेवरील विश्वासावर झालेल्या हल्ल्याचा निषेध : प्रशांत यादव
यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले, की कोणत्याही राष्ट्रीय परीक्षेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि कायद्याचे राज्य ही तीन तत्वे मूलभूत आहेत. जर कुठे त्रुटी असतील, तर त्या पुराव्यासह, कायदेशीर मार्गाने आणि संस्थात्मक चौकशीतून सोडवायच्या असतात. मात्र तरुणांच्या मनात गोंधळ निर्माण करून काही लोक नकळतपणे त्या देशविरोधी शक्तींना मदत करत आहेत. म्हणूनच अशा प्रकारच्या बेजबाबदार कृतीचा आम्ही ठाम निषेध करतो. कारण देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न हा देशाच्या व्यवस्थेवरील विश्वासावरचा थेट हल्ला असल्याचेही यावेळी श्री. यादव यांनी आवर्जून नमूद केले.














