रत्नागिरी, (आरकेजी) : बेरोजगारी ही आपल्या देशातील प्रमुख समस्या असून मुद्रा बँक योजनेमुळे या समस्यावर मात करता येवू शकते असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केले.
मुद्रा बँक योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी अल्पबचत सभागृह येथे आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात ते बोलत होते.
आज देशातील तरुण पिढीला बेरोजगारीतून सोडविण्यासाठी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सामाजिक तसेच सर्वांगीण विकासासाठी अनेक नवनवीन योजना, संकल्पना राबविल्या आहेत. त्यापैकी एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना मुद्रा बँक योजना या योजनेमध्ये कोणतेही अनुषंगिक तारण अथवा जामिनदारा शिवाय होतकरु, बेरोजगार तरुण, तरुणीना कर्ज पुरवठा करुन त्यांच्या हाताला काम देण्यासाठी मुद्रा बँक योजना सुरु करण्यात आली आहे, असेही श्री. घोरपडे यांनी सांगितले.
समाजात निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांचा संबंध हा रोजगाराशी आहे म्हणूनच गेल्या काही वर्षामध्ये मागे पडलेल्या रोजगार निर्मितीच्या क्षेत्रावर मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्थिक भर देऊन जीवनात यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगण्याऱ्या लाखो तरुण बुध्दीवान होतकरु बेरोजगारांना रोजगार निर्मितीचे नवे दालन मुद्रा बँक योजनेच्या रुपाने उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज मिळण्यासाठी शिशुगट किशोरगट आणि तरुण गट अशा तीन गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये शिशुगटातंर्गत ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते किशोर गटांतर्गत ५० हजारापासून ते ५ लाखापर्यंत कर्ज मिळू शकते आणि तरुण गटातंर्गत ५ लाखापासून ते १० लाखापर्यंत कर्ज मिळू शकते असेही श्री. घोरपडे म्हणाले. मुद्रा बँक योजनेचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच अतिदुर्गम भागातील गरजू आणि होतकरु व्यक्ती आणि बेरोजगारांना व्हावा यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्रा बँक योजना समन्वय समिती मुद्रा बँक योजनेचा प्रचार व प्रसार करणार आहे. सदर समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी हे आहेत. या स्वयंरोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील ३० बँकेनी आपले स्टॉल लावले होते. या सर्व बँकाना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला.
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संदिप अडसूळ, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी श्रीनिवास जरंडीकर, नियोजन विभागाचे लेखाधिकारी मनोज पवार, जिल्हा माहिती कार्यालयाचे राहुल भालेराव तसेच जिल्ह्यातील बँकेचे प्रतिनिधी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.