डोंबिवली : शिक्षक हे आपले गुरुच आहेत. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्याच दिवशी शिक्षकदिन साजरा करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे ते शिकवतात. शाळा किती मोठी आहे हे महत्वाचे नसून तिथे ज्ञान कसे मिळते हे महत्वाचे आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत उत्तिर्ण होऊन उच्च पदस्थ अधिकारी व्हावा हे ध्येय गाठीशी ठेऊन शिक्षकांनी भविष्यातील पिढी घडवावी. आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य हवे असल्यास शाळेसाठी ते देण्यास सर्वच ग्रामस्थ तयार आहेत असे प्रतिपादन मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी कोळे येथील जिल्हा परिषद शाळेतील आयोजित कार्यक्रमात केले.
समाजसेवक स्व. हरिश्चंद्र बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळा कोळेगाव मधील विद्यार्थ्यांना वह्या व डब्यासह खाऊचे वाटप कार्यक्रम सोमवारी कोळेगांव शाळेत आयोजित केला होता त्यावेळी घरत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोळेगांवाचे माजी सरपंच तथा मनसे उपविभाग अध्यक्ष रणजित पाटील, कोळेगांव सेवा समितीचे चेअरमन अमित पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील, पोलीस पाटील यज्ञेश्वर पाटील, रवी म्हात्रे, ज्ञानेश्वर संते, हेदुटणेचे सरपंच तकदिर काळण, मनसे शाखा अध्यक्ष, सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य, भोलानाथ पाटील, मुख्याध्यापिका मिनाक्षी शिंपी आदी उपस्थित होते.
स्व. हरिश्चंद्र बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ सलग दुसऱ्या वर्षीही विद्यार्थ्यांना वह्या व डब्यासह खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सर्व पक्षीय मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. दोनशे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करतांना विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. यावेळी मुख्याध्यापिका मिनाक्षी शिंपी यांनी सांगितले कि, यावर्षी शाळेतील पाचवीत शिकणारी वैष्णवी शिंदे हीची “नवोदय” शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. तीचे बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत होणार आहे. तसेच यंदाच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत तनीश देसाई व सोनाली बन्सल हे विद्यार्थी गुणवत्ता यादित झळकले आहेत. ग्रामीण भागातील शाळेसाठी ही आभिमानास्पद बाब आहे. अनेक परप्रांतीय मुले ज्यांची मातृभाषा मराठी नाही तेही या शाळेत शिक्षण घेऊन यश संपादन करतात ही उल्लेखनीय गोष्ट आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचे शिक्षक प्रकाश एडगे यांनी केले तर जयदास पाटील, किशोर म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थांनी यांनी विशेष सहकार्य केले.