मुंबई : राज्यातील तरूणांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यात येतील. लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येईल. यासंदर्भात शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारने बेरोजगारीचे सर्वेक्षण दर तीन महिन्यांनी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत वार्षिक सर्वेक्षण करण्यात येत होते. मात्र, यापुढे त्रैमासिक अहवालाद्वारे आकडेवारी प्राप्त होणार आहे. नवीन वेतन आयोगानुसार भरती करण्यात येणाऱ्या पदांचा आढावा घेण्यात येणार असून, यानंतर भरती करण्यात येणार आहे. गृह, कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा व जलसंपदा, या विभागांना पूर्ण भरतीचा अधिकार देण्यात आलेला आहे. एमपीएससीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोकरीच्या संधी देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.