मुंबई – अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या विक्रोळी, पार्कसाईट येथील नागरिकांनी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्या जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या. खा. संजय दिना पाटील यांनी सर्व नागरिकांना आश्वासन दिले की आपल्या समस्यांवर लवकरच कामाला सुरवात करुन त्याचे निराकरण करण्यात येईल.
‘खासदार आपल्या दारी’ या उपक्रमा अंतर्गत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा जनता दरबार विक्रोळी, पार्कसाईट, वानी समाज हॉल येथे घेण्यात आला होता. या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या असून डोंगराळ भागात टेकड्यांवरील वस्त्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत स्थानिक आमदारांना वारंवार सांगुनही त्यावर काहीच उपाय योजना करण्यात येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याच प्रमाणे लोकसंख्याच्या मानाने या भागात सार्वजनिक सुलभ शौचालय नसल्याची समस्या मांडण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागतो. अनेक भागात रस्ते नाहीत तर असलेल्या रस्त्यांवर खड्डे असल्याने पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. सांडपाण्याची व्यवस्था खराब असल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गटारे, नाल्यांची साफसफाई व्यवस्थित केली जात नसल्याने पाण्याचा योग्य तो निचरा होत नाही. त्यामुळे या भागात नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागतो. या भागात आरोग्य विषयक अनेक समस्या असून त्यावर योग्य तो उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. खा. संजय दिना पाटील यांनी नागरिकांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगतले. याबाबत महानगरपालिकेच्या अधिका-यांशी चर्चा करुन सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्याबाबत सुचना करणार असल्याचे खा.संजय दिना पाटील यांनी सांगितले.