मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) – मुंबईत भांडुप ते विक्रोळी दरम्यान लाखो कोकणवासी राहतात. त्यांना कोकणात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दिवा रेल्वे स्थानकावर जावे लागते. याचा सर्वाधीक त्रास महिला, लहान मुले व वृद्धाना होतो. यासाठी भांडुप रेल्वे स्थानकात कोकणला जाणा-या व येणा-या सर्व गाड्यांना थांबा देण्यात यावा, तसेच दोन्ही प्लॅटफार्मची लांबी वाढविण्यात यावी, अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
खा. संजय पाटील हे २००९ ते २०१४ या दरम्यान खासदार असताना त्यांनी कोकणात जाणा-या व येणा-या सर्व गाड्यांना भांडुप रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत रेल्वेच्या महाव्यवस्थापका बरोबर झालेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते की सर्वे करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. मात्र आजगायत याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने खा. संजय दिना पाटील यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित करीत ही मागणी केली आहे. याचा फायदा मुलुंड, भांडुप तसेच कांजुर व विक्रोळी भागात राहणा-या कोकणवासीय प्रवाशांना होणार आहे.