
हायमास्ट व विद्युत दिव्याच्या कामाला सुरवात
मुंबई, दि.११ (प्रतिनिधी) – देवनार डम्पिंग रोडवरील हायमास्ट दिवे व सुमारे २० पोलवरील विद्युत दिवे बंद झाल्याने हा सर्व परिसर रात्रीच्या वेळी अंधारात बुडालेला होता. त्यामुळे चोरी, संशयास्पद हालचाली व असामाजिक तत्त्वांचा वावर या भागात वाढला होता. मात्र खा. संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पालिकेने हायमास्ट दिवे लावून व इतर २० पोलवरील दिव्यांची दुरुस्ती केली. त्यामुळे हा सर्व परिसर लवकरच प्रकाशमय होणार आहे.

अनेक महिन्यांपासून देवनार डम्पिंग रोडवरील हायमास्ट दिवे व इतर पोलवरील २० विद्युत दिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला होता. याबाबत स्थानिक नागरीकांनी अनेकदा पालिकेच्या एम पूर्व विभागाकडे तक्रार अर्ज केले होते. मात्र पालिकेचे अधिकारी तक्रार अर्जांकडे कानाडोळा करीत. त्यामुळे पाठपुरवठा करुन थकलेल्या नागरीकांनी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खा. संजय दिना पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. खा. संजय दिना पाटील यांनी पालिकेच्या एम पूर्व वार्डचे सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून ही समस्या तातडीने सोडविण्यास सांगितली. त्यानुसार पालिकेच्या अधिका-यांनी देवनार डम्पिंग रोडवर हायमास्ट लावले असून इतर विद्युत पोल वरील २० दिव्यांची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा सर्व परिसर प्रकाशमय होणार असल्याने स्थानिक नागरीकांनी खा. संजय दिना पाटील यांचे आभार मानले.














