मुंबई. दि. २० (प्रतिनिधी) – लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल आणि स्लिपर कोचची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत केली होती. त्यांच्या मागणीनुसार रेल्वे विभाग येत्या काळात १७ हजार स्लिपर कोच निर्मिती करणार आहे. अशी माहिती रेल्वे राज्य मंत्री रवनीत सिंह यांनी एका पत्राव्दारे दिली आहे.
ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी ३७७ अंतर्गत लोकसभेत मुद्दा मांडला होता की लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल आणि स्लिपर कोचची संख्या कमी करुन वातानुकुलीत कोचची संख्या वाढविण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करीत आहे. तसे झाले तर सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे महाग होईल, त्यांच्यावर आर्थिक बोजा वाढेल. त्यामुळे वातानुकुलीत कोचची संख्या वाढविण्याऐवजी जनरल, स्लिपर कोचची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी लोकसभेत केली होती.
खा. संजय दिना पाटील यांच्या मागणीनुसार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी एका पत्राव्दारे माहिती दिली की येत्या काळात १७ हजार स्लिपर कोचची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना स्वस्तात प्रवास करता येणार असून त्यांच्यावर आर्थिक बोजा पडणार नाही. अशी माहिती खासदार संजय दिना पाटील यांनी दिली.